पुसद, येथे अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांचा निसटता विजय झाला. ही निवडणूक राज्यभरात प्रतिष्ठेची मानली जात होती. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर, पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोहिनी नाईक यांनी अल्प मतांच्या आघाडीला कायम राखत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मात्र सर्वात जास्त १४ जागा बळकावित आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ६ जागा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. तर भाजपला फक्त ५ जागेवर समाधान मानावे लागत आहे. शरद पवार गटाच्यावतीने ३ उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली तर पुसद नगर परिषदेमध्ये ३ अपक्ष उमेदवारांनाही मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. अटीतटीच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोहिनी नाईक यांनी काँग्रेसचे डॉ. मोहम्मद नदीम यांचा ६४५ मतांनी पराभव करीत अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा मान मिळविला.





























