मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद, नागपूर यांच्या वतीने दिला जाणारा २०२६ सालाचा अत्यंत मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार’ यवतमाळ जिल्ह्यातील शेळू (ता. आर्णी) येथील समाजभूषण सुरज सुधाकरराव पवार यांना जाहीर झाला आहे. सुरज पवार हे बंजारा समाजाचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, कवी आणि पत्रकार आहेत. त्यांचे वडील प्रसिद्ध साहित्यिक स्व. सुधाकरराव पवार यांनी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘वसंत गीतांजली’ हा काव्यसंग्रह लिहिला होता. या काव्यसंग्रहाचे प्रकाशक म्हणून सुरज पवार यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय ‘समाजभूषण’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.आता त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषदेने त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण १० जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथील राणी झाशी चौकातील ‘फतेचंद मोर हिंदी भवन’ येथे एका शानदार सोहळ्यात होणार आहे. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सुरज पवार यांच्यावर आर्णी तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

























