मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
. आर्णी शहर रंजना आडे…
उन्हाळ्याच्या दिवसात बंजारा समाजातील लग्न समारंभ आणि त्यामध्ये वेळेच्या भानाचा अभाव या विषयावर जनजागृतीची गरज आहे … सध्या उन्हाळ्याचे दिवस. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये बंजारा समाजात विवाहसंस्कारांचं मोठं प्रमाण असतं. घरात आनंदाचं वातावरण, उत्साह, नातेवाईकांची रेलचेल – हे सगळं नक्कीच स्वागतार्ह आहे. पण या आनंदाच्या उत्सवात एक त्रासदायक आणि चिंताजनक वास्तवही दडलेलं आहे – आणि त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं.बहुतेक विवाह सकाळच्या १०-११ वाजताच्या शुभमुहूर्तावर ठेवले जातात. पण प्रत्यक्षात काय होतं? डीजेच्या तालावर तासन् तास नाच, घोड्यावर बसलेला नवरदेव, उगाच वाढवलेली वरात, आणि त्या थाटामाठाच्या नादात निम्मा दिवस वाया जातो. लग्नाची वेळ होते दुपारची ३- वाजेपर्यंत,आता विचार करा—या सगळ्या गोंधळात नुकसान कोणाचं होतं? पाहुणेमंडळी, वृद्ध नागरिक, अंगावर बाळ घेऊन आलेल्या माता, लहानग्या मुला-मुली, आजारी व्यक्ती… यांना कडक उन्हात, धूळ आणि घामात उभं राहावं लागतं. ना नीट सावली, ना पाणी, ना आरामाची सोय. काही ठिकाणी तर उष्माघातामुळे लोकांची तब्येत बिघडल्याचे प्रकारही घडले आहेत.हे कुठल्या परंपरेचा भाग आहे? आनंदाच्या नावाखाली इतरांचं हाल करणं,ही कोणती संस्कृती?वेळेचं भान राखणं ही केवळ शिस्त नाही, तर ही इतरांच्या आरोग्याची आणि सन्मानाची जबाबदारी आहे. डीजेवर नाचायचंच असेल, तर ते वेळेच्या आत आटोपता येतं. वरातीत मोजके लोक, कमी वेळ, आणि नेमकी व्यवस्था ठेवली तरी लग्नाची शोभा कमी होत नाही – उलट, शिस्तबद्धपणामुळे सगळ्यांमध्ये समाधान निर्माण होतं.सण-समारंभ हे एकत्र येण्यासाठी असतात, त्रास देण्यासाठी नव्हे. जर खरा आनंद हवा असेल, तर इतरांचं सुखदुःख ओळखणं शिकावं लागेल. उन्हाच्या झळा झेलणाऱ्या पाहुण्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसलं, तरच खऱ्या अर्थाने माणुसकी जगते.आज आपण थांबलो, विचार केला, आणि समाजाला योग्य दिशा दिली – तरच उद्याचं चित्र वेगळं असेल…..!
