मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
काल दिनांक 8 मे 2025 रोजी च्या संध्याकाळी अंदाजे 7:30 वाजताच्या सुमारास पुसद -दिग्रस रोडवरील वरुड जवळ एका पायी जाणाऱ्या तरुणास मागून येणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की , तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पुसद शहरातील विटाळा जवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथे चालकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल्स गेल्याने मरण पावलेल्या घटनेला नुकतेच चार तास सुद्धा उलटले नाही किच आणखी एका अपघाताच्या घटनेत घरातला कर्ता तरुण मरण पावला आहे. प्राथमिक माहिती अशी की , वरुड येथील रहिवासी असलेला सुनील देवराव चव्हाण वय 21 वर्ष हा नेहमीप्रमाणे गवंडी काम करून घराकडे निघाला होता. त्याने वरुड जवळील पेट्रोल पंपावर आंघोळ करून घराकडे पायी जात असताना , पुसद वरून दिग्रस मार्गे जाणाऱ्या सुझुकी चार चाकी वाहन क्रमांक MH-29-BP- 7246 या वाहणाने वरुड येथील सुनील देवराव चव्हाण यास पेट्रोल पंपाच्या जवळ नर्सरीच्या बाजूला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ,या धडकेत सुनील चव्हाण याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने व नाकातून – तोंडातून रक्त निघाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.या धडकेत चार चाकी वाहनाचा समोरच्या डाव्या बाजूचा भाग मोठ्या प्रमाणावर क्षतीग्रस्त झाला. व चारचाकी वाहणाचा काच सुद्धा फुटला. अपघात घडताच तेथील उपस्थित नागरिकांनी सुनील यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणले. या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे होताच, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतक सुनील देवराव चव्हाण हा घरातील कर्ता मुलगा होता. घरातील कर्त्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने वरुड परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. मृतक सुनील पश्चात आई – वडील , दोन बहिण, चार भाऊ असा आप्त परिवार आहे.
