मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने कोंबून नेणाऱ्या अॅटोचालकांविरुद्ध पुसद पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसाठी मासिक पद्धतीने अॅटोरिक्षांची व्यवस्था केली असली, तरी काही बेफिकीर चालक हे वाहनात प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून नेत असल्याचे वारंवार निदर्शनास येत होते.या गंभीर प्रकाराची दखल घेत पुसद पोलिसांनी अतिक्रमण करणाऱ्या अॅटोचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाईकेली आहे. तसेच, अॅटोरिक्षामध्ये ओव्हरलोड असलेले विद्यार्थी पोलिसांनी सरकारी वाहनातून सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडल्याचेही समजते. या कार्यवाहीमुळे पालक वर्ग व नागरीकांत पोलिसांच्या तत्परतेबद्दलसमाधान व्यक्त केले जात आहे.सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांनी याबाबत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सर्वांचीच आहे.पालकांनी आपल्या मुलांसाठी फक्त सुरक्षित आणि प्रमाणित वाहतूक करणाऱ्या अॅटोरिक्षाच निवडाव्यात. अति प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो, त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.” पुढे ते म्हणाले की, “यापुढे जर कोणी अॅटोचालक प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जात असल्याचे आढळून आले, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून वाहन परवाना रद्द करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.”या कारवाईमुळे शहरातील शाळांबाहेरील अतिकोंबलेल्या अॅटोचालकांना धडा मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.


























