, ३१ जुलै २०२५ – राज्यातील हजारो रिक्त व अधिसंख्य पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी पुसद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आदिवासी समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘आदिवासी कृती समिती, पुसद’च्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो युवक, विद्यार्थी, महिला आणि पालकांनी सहभाग घेतला.या आंदोलनातून हिंगोली येथे सुरू असलेल्या विशेष पदभरती उपोषणाला ठोस पाठिंबा देण्यात आला. विविध तालुक्यांमधून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या भावना मांडत शासनाला ठोस कारवाईचा इशारा दिला.आंदोलनात प्रमुख मागण्या अनुसूचित जमातीसाठी अधिसंख्य १२,५२० पदांची तात्काळ भरती सुरू करावी. राज्यातील ८५,००० रिक्त पदांची भरती प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी. हिंगोली येथील उपोषणकर्त्यांशी तत्काळ चर्चा करून निर्णय घ्यावा. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हक्कांचे ठोस धोरण जाहीर करावे.या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर सविनय कायदेभंग आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. नेतृत्व आणि आयोजन:* आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष देविदास डाखोरे यांनी केले. उपाध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, संतोष गारोळे, प्रकाश मोरे, सचिव संदीप आढाव, सहसचिव अतीश वाघमारे, तसेच सल्लागार म्हणून अँड. रामदास भडंगे, सुरेश धनवे, गणपत गव्हाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यात माधवराव वैद्य, देवेंद्र खडसे, नाना बेले, शरद ढेंबरे, मारोती भस्मे ज्ञानेश्वर मेटकर यांसह अनेकांनी सहभाग घेतला. शांतता व सहकार्य: या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने शांतता राखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या. कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले. कृती समितीने पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. शासनाचे लक्ष वेधले: पुसदसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून या आंदोलनाची तीव्र दखल घेतली जात असून, आदिवासी समाजाच्या एकतेचे दर्शन आज पुसदच्या रस्त्यावर पाहायला मिळाले. लवकरच शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा कृती समितीने व्यक्त केली तरी आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला या आंदोलनामध्ये युवक, विद्यार्थी, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
